"तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे."
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सरन्यायाधीश गवई यांच्या प्रत्येक निरीक्षणातून जनसामान्यांच्या न्यायावरील विश्वासाची जाणीव दिसते आणि न्यायालयाने केवळ कायद्याची अंमलबजावणी न करता समाजहिताचा विचार करावा ही त्यांची धारणा प्रकर्षाने प्रकट होते. त्यामुळेच सरन्यायाधीश गवई हे न्यायव्यवस्थेत थेटपणाचे आणि निष्पक्षतेचे जिवंत प्रतीक मानले जातात. आता त्यांनी थेट भगवान विष्णु यांच्या संबंधित एका याचिकेवर रोखठोक भूमिका घेतली.
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी ही याचिका 'प्रसिद्धी याचिका' असल्याचे सांगितले.
सरन्यायाधीशांनी म्हटले, "जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे." याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. "ही एक पुरातत्त्वीय धरोहर आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे," असे खंडपीठाने नमूद केले.
न्या. गवई म्हणाले, "दरम्यान, जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल, तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा." शेवटी खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
याचिकेत मागणी करण्यात आली होती की, "भगवान विष्णूची सात फूट उंच भग्न मूर्ती बदलून नवी मूर्ती जवारि मंदिरात प्रतिष्ठापित करावी." यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसह एएसआयकडे निवेदने देण्यात आली होती. मात्र एएसआयने स्पष्ट केले की "मूर्ती बदलणे हे संवर्धन नियमांच्या विरोधात आहे." ही याचिका अॅड. संजय नुली आणि अॅड. अखिला वाली यांनी दाखल केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.