Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्टेट बँकेत पिस्तूल, चाकूने धमकावत दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला

स्टेट बँकेत पिस्तूल, चाकूने धमकावत दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला

विजयपूर : खरा पंचनामा

चडचण (जि. विजयपूर) शहरातील उमदी-पंढरपूर महामार्गावर चार ते पाच दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व कोट्यवधींची रोकड असा सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून, दरोदेखोरांचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत दरोडेखोरांनी बँकेतून चोरलेल्या मुद्देमालाच्या तपशिलाची चौकशी सुरू होती. या धाडशी दरोड्याच्या घटनेने चडचणसह परिसरातील गावांत मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचारी प्रवेशद्वाराला कुलूप न लावता काम करत होते. दरम्यान, तीन बुरखाधारी शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूने धमकावले.

स्ट्रॉगरूममधून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बांधले आणि गळा दाबला. त्यांनी अवघ्या २० मिनिटांत बँक लुटली आणि पळून गेले. बँकेच्या बाहेर दुचाकीवर दरोडेखोरांचे दोन साथीदार उभे होते. यानंतर एका ग्राहकाने बँकेत जाऊन पाहिले की कर्मचाऱ्यांचे हात बांधलेले होते आणि तोंड बांधलेले होते. त्यांना सोडवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. चडचण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

दरोड्यात किती रोकड पळविली, गुन्हा कसा घडला, यांसारख्या तपशीलाची माहिती तपासानंतरच कळेल. गेल्यावर्षीच मनगुळी येथील कॅनरा बँकेत चोरी झाल्याचे घटना ताजीच आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.