"माझ्या विरोधात राजकीय मोहीम"
नवी दिल्ली : खरा पंचनामा
ई ट्वेण्टी इंधन अर्थात २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे, अशी टीका सोशल मीडियातून काही दिवसांपासून होत आहे. या टीकेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा उत्तर दिले. तसेच ई ट्वेण्टीच्या वापरावरून माझ्याविरोधात पैसे देऊन राजकीय मोहीम चालवली जात असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ई ट्वेण्टी इंधन अंमलबजावणी कार्यक्रमाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती.
तसेच नवे वाहन खरेदी करताना जुने वाहन विकायला काढल्यास त्यावरील जीएसटी माफ करण्यात यावा, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. असा निर्णय झाल्यास ग्राहक आणि संबंधित क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनात केंद्रीय नितीन गडकरी यांना ई ट्वेण्टी वापराबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देत असताना गडकरी यांनी त्यांच्याविरोधात पैसे देऊन मोहीम चालवली जात असल्याचा आरोप केला.
नितीन गडकरी यांनी या अधिवेशनात बोलताना म्हटले, 'ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) सारख्या संस्थांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यासंदर्भात त्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. तुमचे (ऑटोमोबाइल) क्षेत्र ज्या प्रकारे काम करते, त्याप्रकारेच आमचे (राजकीय) क्षेत्रही काम करते. मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी माझ्याविरोधात पैसे देऊन सोशल मीडिया मोहीम राबवली गेली. इथेनॉलच्या वापराबाबत कोणतीही शंका-कुशंका नाही. इथेनॉलचा वापर किफायतशीर आणि प्रदूषणमूक्त आहे.'
आपण २२ लाख कोटी रुपये इंधन आयात करण्यासाठी खर्च करतो. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की, आपला भारत स्वावलंबी झाला पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जर हेच २२ लाख कोटी रुपये वाचणार असतील तर हे आपण करायला नको का?, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.
गडकरी पुढे म्हणाले की, आम्ही मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील शेतकऱ्यांचा ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. मक्याला १२०० रुपये क्विंटल दर मिळत होता, आज २८०० रुपये क्विंटलला दर मिळत आहे. आपल्याकडे तांदूळ, गहूदेखील अतिरिक्त होत आहे. त्यापासूनही इथेनॉल तयार होत आहे. त्यामुळे इथेनॉल शेतकऱ्यांच्या फायदेचच आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.