"काही लोकांना राजकीय दृष्टीकोन ठेवून मोर्चा काढायचा असेल तर ते चूक"
मुंबई : खरा पंचनामा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकाराने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जीआरमधील भाषा संभ्रमित करणारी आहे. त्यामुळे अनेक नेत्यांमध्ये मतांतरे आहेत.
जीआरमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, मराठा समाजातील ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे, त्यांच्या गावातील, कुळातील, नातेवाईकातील कुणाकडेही कुणबी प्रमाणपत्र असेल; तर प्रतिज्ञापत्राच्या आधारावर मागणी करणाऱ्या अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र मिळेल.
मराठा आंदोलकांकडून याचा अर्थ, मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा काढला जातोय. मुख्यमंत्री आणि सरकारमधली छगन भुजबळ सोडता इतर मंत्री मात्र हा ओबीसींवर अन्याय नाही, असं म्हणत आहेत. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवर, लक्ष्मण हाके; हे आपापल्या पद्धतीने जीआरविरोधात लढा देत आहेत.
ओबीसी समाजाच्या वतीने पुढील महिन्यात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. शिवाय त्यांनी मोर्चा काढणाऱ्या ओबीसी नेत्यांना सणसणीत चपराक लगावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने कुणबी आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर कुणावरही अन्याय करत नाही. हा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा नाही, हा जीआर सरसकट आरक्षण देणार नाही, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, जे लोक कायद्याने आणि पुराव्यानिशी अर्ज सादर करतील त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ओबीसी नेत्यांनी योग्यरित्या जीआरचा अभ्यास केला पाहिजे. मी सातत्याने ओबीसी नेत्यांशी बोलत आहे. त्यांच्याही या गोष्टी लक्षात येत आहेत. परंतु काही लोकांना राजकीय दृष्टीकोन ठेवून मोर्चा काढायचा असेल तर ते चूक आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.