Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

पुणे : खरा पंचनामा

कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. तो लंडनला पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. पोलिसांकडून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

त्यातच त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट पत्ता वापरल्याची बाब पोलिस तपासामधून पुढे आलीय.

लंडनला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी चक्क अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर आलंय. पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पासपोर्ट मिळण्यास अडचण येऊ शकते, हे ओळखून घायवळने अहिल्यानगरमधील बनावट पत्त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी उपयोग केल्याची बाब आता पुढे आली आहे.

अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड; हा पत्ता घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरलाय. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्टसाठी संमती कशी दिली? हा प्रश्न उपस्थित झाल्याने पोलीस वादात सापडू शकतात. पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभला? असा प्रश्न उपस्थित होतोय.

कोथरूडमध्ये १७ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घायवळ टोळीतील गुंडांनी क्षुल्लक कारणावरून गोळीबार केला. या घटनेत प्रकाश मधुकर धुमाळ हा तरुण गंभीर जखमी झाला होता. यानंतर टोळीतील गुंडांनी जुन्या वादातून आणखी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते.

या दोन्ही घटनांची नोंद कोथरूड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांनी घायवळ टोळीतील मयूर गुलाब कुंबरे (वय-२९), आनंद अनिल चांदळेकर (वय-२४), गणेश सतीश राऊत (वय ३२), मयंक ऊर्फ माँटी विजय व्यास (वय-३०) आणि दिनेश राम पाठक (वय-२८, सर्व रा. कोथरूड) या पाच जणांना अटक केली होती. इतरांचा पोलिस शोध घेत आहेत.

कोथरुडमधील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळसह टोळीतील दहा जणांविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. मात्र घायवळला अटक करण्यापूर्वीच तो परदेशामध्ये पसार झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.