मिरजेत तरुणाचा निर्घृण खून : एकजण ताब्यात
धारदार शस्त्राने सपासप वार : पूर्ववैमनस्य की राजकीय वाद?
मिरज : खरा पंचनामा
शहरातील गणेश तलावाजवळ एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले.
निखिल कलगुटगी (वय 34, रा.वडर गल्ली, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा खून पूर्व वैमनस्यातून झाला की राजकीय वादातून याबाबत शहरात चर्चा सुरु आहे. पोलीस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, निखिल कलगुटगी याचा व काही जणांचा गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता. याच वादातून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निखिल याला काही जणांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गणेश तलाव येथे बोलावून घेतले होते. तो आल्यावर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
याबाबत माहिती मिळताच निखिलच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्य झाला. त्यानंतरा शासकीय रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी मिरजेत चर्चजवळ गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेशी देखील निखिलच्या खुनाचा संदर्भ जोडला जात आहे. तसेच निखिल याचा एका राजकीय पक्षात प्रवेश होणार होता. तो मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश करणार होता. या कारणातून देखील त्याचा खून झाला का? असा देखील संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.