७ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदके पटकावून कोल्हापूर परिक्षेत्र संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद
२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा : कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
पुणे : खरा पंचनामा
पुणे येथे नुकताच २० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात कोल्हापूर परीक्षेत्र संघाने ७ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदके पटकावून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला महासंचालक शुक्ला यांच्याहस्ते चषक प्रदान करण्यात आला. महानिरीक्षक फुलारी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
या मेळाव्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण पाच जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांमूधन निवड करण्यात आलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय संघातील सहभागी स्पर्धकांनी सायंटीफक एड टू इन्व्हेस्टीगेशन या स्पर्धा प्रकारामध्ये अन्वर मुजावर, सपोनि (सातारा) यांनी १ सुवर्ण पदक व १ रौप्य पदक, पोलीस फोटोग्राफी या क्रिडा प्रकारामध्ये रघुनाथ शिंदे, (पुणे ग्रामीण) यांनी १ सुवर्ण पदक, घातपात विरोधी तपासणी या क्रिडा प्रकारामध्ये संदीप पांडव (सातारा) यांनी १ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक व अमोल गवळी, (सातारा) यांनी १ रौप्य पदक, काम्प्युटर अवेरनेस या क्रिडा प्रकारामध्ये निखील जाधव (सातारा) यांनी २ सुवर्ण पदके, श्री. प्रसाद मांढरे (सोलापूर ग्रामीण) यांनी १ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक, अजय सावंत (कोल्हापूर) यांनी १ सुवर्ण पदक तर श्वान स्पर्धा या क्रिडा प्रकारामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाकडील श्वान सूचक यांसह श्वान हस्तक दत्तात्रय चव्हाण व सचिन भोसले (जिल्हा सातारा) यांना १ सुवर्ण पदक मिळविले आहे. अशा प्रकारे कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाने एकूण ७ सुवर्ण पदके, ४ रौप्य पदके व १ कांस्य पदक (१२ पदके) पटकावून महाराष्ट्र राज्यामधून सहभागी झालेल्या २६ संघामधून सर्वसाधारण सांघीक उपविजेतेपद पटकावले आहे. यासह कॉम्युटर अवेरनेस या स्पर्धा प्रकारामध्ये ३ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक व १ कांस्य पदक मिळवून कॉम्प्युटर अवेरनेस विनर ट्रॉफी पटकावली आहे. त्याचबरोबर पोलीस फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी विनर ट्रॉफी पटकावली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचे व्यावसायीक कौशल्य वापरुन गुन्हे तपास, दैनंदिन कामकाज, फॉरेन्सीक कामकाज, घातपात विरोधी तपासणी, श्वानांचे कामकाज आदी कामकाजामध्ये अंमलदारांचे व्यवसायीक कौशल्य वापरुन कामकाजामध्ये गती व सुलभता कशा प्रकारे येईल या अनुषंगाने पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून दरवर्षी करण्यात येते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन एकूण २६ संघांनी भाग घेतला होता. यामध्ये सर्व पोलीस आयुक्तालये, सर्व परिक्षेत्रे, सीआयडी, एमआयए, फोर्सवन, बिनतारी संदेश विभाग, रेल्वे, राज्य राखीव पोलीस बल, दहशतवाद विरोधी पथक आदी घटकांनी सहभाग घेतला होता. या पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले होते.
या सर्व कामगिरीसाठी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, साताऱ्याचे अधीक्षक तुषार दोशी, सांगलीचे अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, साताऱ्याच्या अपर अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.