"थेट पाकिस्तानमधून धमक्या येत आहेत"
अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : खरा पंचनामा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली.
या वेबसिरीजमध्ये आपली बदनामी झाल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला. त्यांनी शाहरुख खानची कंपनी 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि 'नेटफ्लिक्स' विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
याबाबत बोलताना क्रांती रेडकर यांनी सांगितले की, ' 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या रिलीजनंतर वानखेडे कुटुंबाला सतत धमक्या आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.'
'आम्हाला धमक्या येत आहेत, त्यात पाकिस्तानातूनही मेसेज आले आहेत. हे सर्व आम्ही याचिकेत नमूद केले आहे. आमच्याकडे कोट्यवधी रुपये नाहीत, आमच्याकडे फक्त सत्य आहे आणि ते आम्ही मांडत राहू,' असे क्रांती म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'समीर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वाभिमानाला ठेच लागली तर ते गप्प बसणार नाहीत. हा लढा आत्मसन्मानासाठी आहे आणि बायको म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. आम्हाला सतत ट्रोल केलं जात आहे, पण जनता मूर्ख नाही. समीर यांनी आयुष्यभर देशाची सेवा केली आहे. ज्यांनी समीरचे काम पाहिले आहे आणि ज्यांना कायदे कळतात, ते आमच्या बाजूने नेहमी उभे आहेत. आम्ही सत्याची बाजू मांडत राहणार.', असेही त्यांनी नमूद केले.
क्रांती रेडकर यांनी या वादाचा स्वतःच्या करिअरवर झालेला परिणाम सांगताना म्हटलं, 'या प्रकरणानंतर मला हिंदी इंडस्ट्रीत काम मिळणं कठीण झालं आहे. पण याबद्दल खंत नाही. एक लढाई लढताना काही तरी गमवावं लागतं. मात्र मराठी इंडस्ट्रीचा मला नेहमी पाठिंबा आहे.'
2021 मध्ये समीर वानखेडे एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच घटनेचा संदर्भ 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये घेतला गेला असून, एका सीनमध्ये त्यांची खिल्ली उडवल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी शाहरुख खान मालक असलेल्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि नेटफ्लिक्सवर या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.