Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"त्या लोकांचा धंदा मारला, मग ते लोक माझ्यावर नाराज होणार नाहीत का?"

"त्या लोकांचा धंदा मारला, मग ते लोक माझ्यावर नाराज होणार नाहीत का?"

नागपूर : खरा पंचनामा

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावरून विरोधी पक्ष आणि समाजमाध्यमांवरून काहीजण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करत आहेत.

काँग्रेसने आरोप केला आहे की "गडकरी यांनी इंधन धोरणात बदल केल्याने त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना लाभ होत आहे." तर, काही तज्ज्ञ आणि विरोधक असा आरोप करत आहेत की "पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते किंवा इंजिन खराब होण्याची शक्यता आहे." या सगळ्या आरोपांवर आता गडकरी यांनी उत्तर दिलं आहे.

मंत्री गडकरी म्हणाले, "मी आजवर एकाही कंत्राटदाराकडून साधा एक रुपया देखील कधी घेतला नाही. त्यामुळे ते मला घाबरतात. त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं तर मी त्यांची ऐशीतैशी करतो म्हणून ते मला घाबरतात. त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी कधीही खोटी कामं केली नाहीत. कोणीही कितीही खोटे आरोप केले तरी मी विचलीत होत नाही. तुम्हीही कुठल्याही टीकेमुळे विचलीत होऊ नका. कारण जनतेला सत्य माहिती आहे."

गडकरी म्हणाले, "आताच्या काळात राजकारण हा ईर्ष्या, मत्सर व अहंकाराचा खेळ झाला आहे. आपली रेष मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष पुसली तर आपली रेष आपोआप मोठी होते असा विचार करून काम करणाऱ्यांबाबत काय बोलावं ? अशा लोकांमध्ये मी अनेकदा संकटात सापडलो आहे. परंतु, मला एक गोष्ट माहिती आहे की जनता अशा लोकांवर विश्वास ठेवत नाही."

"ज्या झाडाला फळं लागतात, त्याच झाडाला लोक गोटे (दगड) मारतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. माझ्याकडे इनोव्हा कार आहे जी १०० टक्के इथेनॉलवर चालते. शेतकऱ्याच्या धानाच्या कणसापासून, मक्यापासून, ऊसाच्या रसापासून, मोलासेसपासून तयार झालेल्या इथेनॉलवर चालते. यातून शेतकऱ्याला फायदा मिळाला आहे. जीवाश्म इंधन खरेदी करण्यासाठी आपण दर वर्षी २२ लाख कोटी रुपये खर्च करत होतो. इतके पैसे आपल्या देशातून बाहेर जात होते. मात्र, आपण आपल्या देशात तयार होणाऱ्या इथेनॉलला प्राधान्य दिलं. त्यामुळे त्या लोकांचा (इंधन कंपन्या) धंदा मारला. मग त्या कंपन्या चालवणारे लोक माझ्यावर नाराज होणार नाहीत का? ते माझ्यावर नाराज झाले आहेत त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात पेड न्यूज (पैसे देऊन पसरवल्या जाणाऱ्या बातम्या) पसरवणं चालू केलं आहे."

गडकरी म्हणाले, "त्या लोकांनी कितीही पेड न्यूज चालवल्या तरी तुम्ही चिंता करू नका. तुमचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे कोणीच आपलं नुकसान करू शकत नाही."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.