महायुतीच्या मंत्रिमंडळात आठवडाभरात फेरबदल ?
मुंबई : खरा पंचनामा
सहा महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचे आठवडाभरात मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ घातले असून, त्यासाठी राष्ट्रवादीचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र पायउतार व्हावे लागेल, असे खात्रीलायक वृत्त आहे.
मागील सहा महिन्यांपासून मुंडे मंत्रिमंडळात नाहीत. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, असा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड गजाआड झाला.
या हत्याकांडात वाल्मीक याच्या साथीदारांवर 'मोका' लागला. मात्र, वाल्मीक याच्यावर हे कलम अद्याप लावले गेलेले नाही. त्याचा तपास सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला होता.
सरपंच हत्याकांड व अन्य प्रकरणांची चौकशी मागे लागल्याने मुंडे इतक्यात मंत्रिमंडळात परत येत नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागताच मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची हीच संधी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळखले, असे कळते.
राज्यात जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांतच 2029 च्या विधानसभा निवडणुकांचे मैदान आखले जाणार असल्याने धनंजय मुंडे यांच्यासारख्या चेहर्याला मंत्रिपदापासून दूर ठेवणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळावला.
त्यामुळे मुंडे यांच्यावर आठवडाभरात मंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश सुलभव्हावा, यासाठी पक्षाचे मंत्री झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार असून, त्यांना पक्षाचे मोठे पद दिले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री बदल करणार असल्यामुळे या फेरबदलात किमान तीन खात्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार भाजपकडूनही सुरू असून, किमान तीन मंत्री वगळून त्यांच्या जागी नवे चेहरे आणण्याचे भाजपमध्ये घाटत असल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.