मराठा आरक्षणासाठी देवी लसीकरण नोंदीचा वापर करण्याची शिंदे समितीची शिफारस
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रयत्नांना नवीन दिशा मिळाली आहे. ब्रिटिश काळातील देवी लसीकरणाच्या नोंदवह्यांमधून कुणबी-मराठा नोंदी मिळण्याची शक्यता माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने व्यक्त केली आहे.
या वह्यांमधील जातीच्या नोंदी वैयक्तिक पुरावा म्हणून वापरता येऊ शकतात का, याची पडताळणी करण्याची शिफारस समितीने सरकारला केली आहे. आतापर्यंत विविध पुराव्यांच्या आधारावर ५८ लाखांहून अधिक नोंदी शोधण्यात यश आले असून लसीकरण वह्यांच्या ह्या पुराव्यावर सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजातील आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. हे काम मुख्यतः जुन्या सरकारी दस्तऐवज, गावातील नोंदी आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांवरून चालू आहे. यामुळे अनेक मराठा समाजातील लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी जातीच्या नोंदी मिळत आहेत, ज्याचा आरक्षणासाठी फायदा होऊ शकतो.
आता या शोधात एक नवीन दिशा मिळाली आहे. ब्रिटिश काळातील देवी लसीकरणाच्या नोंदवह्यांमधून कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रात देवीच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले होते. या लसीकरणाच्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या नावासोबत त्यांची जातही नोंदवली जात असे. त्यामुळे या जुन्या वह्यांमध्ये कुणबी किंवा मराठा जातीचा उल्लेख सापडू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत महत्त्वाची शिफारस केली आहे. समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या चौथ्या अहवालात या लसीकरण नोंदवह्यांचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो अशी सूचना केली आहे. या वह्यांमधील नोंदी वैयक्तिक पुरावा म्हणून मान्य होऊ शकतात का, याची पडताळणी करण्यासाठी समितीने सरकारला सांगितले आहे. तसेच, अनेक लोकांकडे त्यांच्या पूर्वजांच्या वैयक्तिक कागदपत्रे सापडत आहेत, ज्यांचा उपयोग आरक्षणासाठी होऊ शकतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.