वैष्णवी हगवणे प्रकरण; सासु, नणंदेसह पतीचा मित्र निलेश चव्हाणला दणका
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसार यांनी फेटाळून लावला. 'हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे', असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय २१, दोघी रा. भुकूम, मुळशी) आणि नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत.
हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुळशी) यांनी १६ मेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाइकांना पिस्तूल दाखवून धमकावणारा नीलेश चव्हाण यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लता, करिष्मा आणि नीलेशने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत तिंघांना चांगलाच दणका दिला आहे. 'शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर तीस जखमा आढळून आल्या होत्या. तिचा सातत्याने क्रूर पद्धतीने छळ केला जात होता. तिने सासरी आत्महत्या केली आहे. समाज माध्यमातील संवाद आणि साक्षीदारांची साक्षीमुळे वैष्णवीचा छळ होत असल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी नीलेशचे म्हणणे हगवणे कुटुंबीय ऐकत होते. त्याने वैष्णवीचा पती शशांक आणि नणंद करिश्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट केले. मोबाइल संवाद आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेश एकमेकांच्या संपर्कात होते', असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील पवार आणि अॅड. निंबाळकर यांनी केला. न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून वैष्णवीची सासू, नणंद आणि तिच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
वैष्णवीाला नऊ महिन्यांचा मुलगा आहे. कोणतीही आई बाळाशिवाय राहू शकत नाही. वैष्णवीने छळामुळे टोकाचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यास तिला आरोपींनी भाग पाडले. हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे. या प्रकरणातील आरोपीना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यात छेडछाड करतील, तसेच साक्षीदारांवर दबाब आणतील, तसेच समाजहितही लक्षात घेणे गरजेचे आहे' असे निरीक्षण न्यायाधीश क्षीरसागर यांनी नोंदविले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.