जळगावात शिंदे गटाचा माजी महापौर बोगस कॉल सेंटर प्रकरणी गोत्यात.!
जळगाव : खरा पंचनामा
शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी रविवारी छापा टाकून ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या प्रकरणी, सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेल्या कोल्हे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जळगाव-ममुराबाद या दिवस-रात्र वर्दळ असलेल्या रस्त्यालगत कोल्हे परिवाराची मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्याच ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नखाते यांनी रविवारी दुपारच्या सुमारास कोल्हे यांच्या एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकला.
पोलिसांनी अचानक धाड टाकली असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अटक केलेले संशयित हे कोलकाता येथील रहिवाशी आहेत.
दरम्यान, जळगाव पोलिसांनी चौकशीसाठी फार्म हाऊसचे मालक माजी महापौर ललित कोल्हे यांना सुद्धा ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.