मिरजेत देशी बनावटीची पिस्तूले घेऊन फिरणाऱ्या बामणोलीच्या दोघांना अटक
पाच पिस्तूल, 12 काडतूसांसह 3.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील पंढरपूर रस्त्यावरील रमा उद्यानजवळ देशी बनावटीची पिस्तूले घेऊन फिरणाऱ्या बामणोली येथील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 पिस्तूले, 12 काडतूसे असा 3.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश येथील मुख्य सूत्रधार पसार झाल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
मलिक सलीम शेख (वय २५), प्रथमेश ऊर्फ पाटया सुरेश पाटोळे (वय २२ वर्षे, दोघे रा. बामणोली, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधार राजेद्रसिंग ऊर्फ गोलुसिंग बडवानीसिंग टकराना (रा. ग्राम उमरटी, पोस्ट- बलवाडी, ता. बलवाडी, जि. बडवाणी) हा पसार झाला आहे. बेकायदा शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अमोल ऐदाळे यांना दोघेजण पंढरपूर रस्त्यावरील रमा उद्यान येथील ऑक्सिजन पार्क येथे दोघेजण देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचला. शेख आणि पाटोळे तेथे आल्यावर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. शेख याच्याकडील सॅकची तपासणी केल्यावर त्यात देशी बनावटीची 5 पिस्तूले, 12 काडतूसे सापडली. ती जप्त करून दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर ही पिस्तूले उत्तरप्रदेश येथील टकराना याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. दोघांना अटक करून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, दत्तात्रय पुजारी, उपनिरीक्षक कुमार पाटील, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, सुशिल मस्के, शिवाजी शिद, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते. गणेश शिंदे, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.