कबनूरमध्ये डोक्यात सिमेंट पाईप घालून बँक व्यवस्थापकाचा निर्घृण खून
बारामध्ये शिवीगाळ केल्याचे कारण, पोलिसाच्या भावासह पाच जणांवर गुन्हा, एकजण ताब्यात
इचलकरंजी : खरा पंचनामा
बार बंद होऊनही बाहेर जात नसल्याने तसेच नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटची पाईप घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बारामधील वेटरसह, एका पोलिसाचा भाऊ अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.
अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) असे मृताचे नाव आहे. मृत एका खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री अभिनंदन वैशाली बारामध्ये दारू पित बसला होता. बार बंद करण्याची वेळ झाली तरी तो निघून जात नव्हता. वेटरनी त्याला समजावून सांगितले पण तो ऐकत नव्हता. बार बंद झाला तरी तो जात नव्हता. त्यावेळी त्याने नशेत वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर वेटरने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले.
नंतर मध्यरात्री अभिनंदन याला घरातून बोलावून दुचाकीवरून नेले. कबनूर येथील एका पेट्रोल पंपाजवळ संशयितानी त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घातली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकज चव्हाण याच्यासह चार अनोळखीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.