बनावट नोटाप्रकरणी गांधीनगर येथील एकाला अटक
6.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर येथील बनावट नोटांच्या रॅकेटमधील गांधीनगर येथील आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 6.50 लाखांच्या पाचशे रुपयांच्या 1 हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एका पोलिसासह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
अभिजित राजेंद्र पोवार (वय ४४, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बनावट नोटांची कमीशनवर विक्री करण्यासाठी मिरजेत आलेला सुप्रीत देसाई याला अटक केल्यानंतर बनावट नोटा प्रकरणाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिस दलातील बडतर्फ हवालदार इब्रार इनामदार, त्याचा साथीदार राहुल जाधव याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार व नरेंद्र शिंदे या दोघांना दि. 16 पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिस कोठडीत असणाऱ्या इब्रार आणि नरेंद्र या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांचा अन्य एक साथीदार यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी कबुली दिली.
बनावट नोटा तयार करताना खराब झालेल्या बनावट नोटा, नोटांसाठी वापरलेले कागद हे गांधीनगर येथील अभिजीत पोवार याच्याकडे असल्याची त्यांनी कबुली दिली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक त्याच्या मागावर होते.
अभिजीत पोवार हा कोल्हापूरमधील गांधीनगर येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानुसार पथकाने छापा टाकून त्यास अटक केली. त्याच्याकडून सहा लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५०० रुपयांच्या 1 हजार 300 बनावट नोटा, अर्धवट बनवलेल्या नोटा, हिरव्यारंगाचे स्ट्रीप बंडल, प्रिंटींगचे वेस्टेज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आतापर्यंत पोलिसांनी 98 लाख ४२ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. इतक्याच नोटा असल्याचे त्यांनी तपासात सांगितले होते. परंतु पुढील तपासात आता आणखीन सहा लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत. अन्य कोणाकडे संशयितांनी बनावट नोटा ठेवल्या आहेत का? याचाही तपास आता महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, राहूल क्षीरसागर, नानासाहेव चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विनायक झांबरे, संतोष डामसे, महेश गुरव, संदिप घोडे, विकास कांबळे, सतीशकुमार पाटील, देवानंद नागरगोजे, सुधीर खोंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.