हजार रुपयांची लाच घेताना म्हाडाच्या शिपायाला रंगेहात अटक
ना हरकत प्रमाणपत्रासाठी मागितले पैसे : सांगली एसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना ‘म्हाडा’च्या उपविभागीय कार्यालयातील शिपायाला रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
विजय यशवंत गंगाधर (वय ४८, रा. साखराळे, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी ‘म्हाडा’ कडून घर खरेदी केले होते. या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी ‘म्हाडा’च्या सांगलीतील उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. १५ रोजी तक्रार अर्ज केला.
तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी गंगाधर याने तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावला. आज सकाळी विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्यास रंगेहात पकडण्यात आले. संजयनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नूतन उपअधिक्षक यास्मीन इनामदार यांच्यासह पोलिस निरिक्षक योगेश चव्हाण, अंमलदार अजित पाटील, प्रीतम चौगुले, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, सीमा माने, वीणा जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.