ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार सलीम शेखला अटक : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
कवठेमहांकाळच्या इरळीतील ड्रग्ज कारखान्याशी होता थेट संबंध
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याचा जवळचा सहकारी मोहम्मद सलीम सुहेल शेख याला दुबईहून हद्दपार केल्यानंतर अटक केली आहे. दुबईमध्ये असताना शेख भारतात एक मोठे ड्रग्जचे रॅकेट चालवत होता असा आरोप आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील ड्रग्ज कारखान्याशी त्याचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते.
१६ फेब्रुवारी २०२४ रोजी, गुन्हे शाखेच्या कक्ष ७ पथकाला कुर्ला परिसरात एक महिला ड्रग्ज पुरवणार असल्याची माहिती मिळाली. जलदगतीने कारवाई करत, टीमने सापळा रचला आणि परवीन बानो गुलाम शेख हिला १२.२० लाख रुपयांच्या ६४१ ग्रॅम मेफेड्रोन आणि १२ लाख रुपयांच्या रोख रकमेसह अटक केली. चौकशीदरम्यान, परवीनने सांगितले की तिने साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ दाब्झ कडून ड्रग्ज मिळवले होते, जो दुबईहून सलीम शेख आणि सलीम डोला चालवत असलेल्या नेटवर्कचा भाग होता. तिच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी साजिदला मीरा रोड येथून अटक केली आणि त्याच्या घरातून ६ कोटी आणि ३.६८ लाख रोख किमतीचे ३ किलो एमडी जप्त केले.
सांगली कारखाना दुबई सिंडिकेटशी कनेक्शन
तपास जसजसा वाढत गेला तसतसे गुन्हे शाखेला दुबईस्थित तस्कर आणि सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मेफेड्रोन उत्पादन युनिटमधील संबंध उघडकीस आले. २५ मार्च २०२४ रोजी, गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक नीरज उबाळे यांच्यासह पथकाने इरळी येथील कारखान्यावर छापा टाकला आणि २४५ कोटी रुपयांचे १२२.५ किलो मेफेड्रोन जप्त केले. पोलिसांनी कच्चा माल, उत्पादन यंत्रसामग्री, वाहने देखील जप्त केली आणि या कारवाईत सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली होती.
मुंबईचे पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७, गु. प्र. शा., गु. अ. वि. घाटकोपर, मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, सहायक निरीक्षक धनाजी साठे, उपनिरीक्षक स्वप्निल काळे, महेश शेलार, श्री. सावंत, श्री. कांबळे, श्री. राऊत, विकास होनमाने, श्री. राठोड यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.