दोन दिवस झाले तरीही एक वर्षाच्या साहिलचा शोध लागेना!
सिसिटीव्ही बंद असल्यामुळे पोलीसही हतबल
सांगली : खरा पंचनामा
सोमवारी (दि. 20) रात्री दहाच्या सुमारास विश्रामबाग चौकातून साहिल विक्रम बागडी (वय 1 वर्ष) याचे अज्ञातानी अपहरण केले आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बुधवारी साहिलचे अपहरण होऊन दोन दिवस झाले तरी तो सापडला नाही. स्मार्ट पोलिसिंगसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी सिसिटीव्ही बसवले आहेत. मात्र सध्या ते बंद असल्यामुळे पोलिसांना साहिलचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हतबल झालेले पोलीस ऐन सणासुदीत साहिलचा शोध घेत फिरत आहेत.
विश्रामबाग चौकात साहिल कुटुंबासमवेत आला होता. तेथे त्याचे पालक फुगे तसेच अन्य साहित्य विक्री करतात. त्याच्या कुटुंबाने तेथेच संसार थाटला आहे. सोमवारी रात्री चौकात असणाऱ्या साहिलचे अज्ञातानी अपहरण केले. त्यावेळी त्याचे कुटुंबीय फुगे तसेच अन्य साहित्य विक्रीत गुंतले होते. रात्री उशिरा त्याच्या पालकांना त्याचा शोध घेतला पण साहिल सापडला नाही. पहाटे त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेसह सर्व अंमलदारांना तातडीने साहिलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर पोलिसांनी सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला पण सिसिटीव्हीच बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दुकानदारांकडे सिसिटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मीपूजन तसेच सणाचे कारण सांगत त्यांना दुकानात प्रवेश नाकारला त्यामुळे पोलिसांना सिसिटीव्ही फुटेज मिळाले नसल्याने साहिलचा शोध अंधारात बाण मारल्यासारखा सुरु आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेणार का?
सांगली शहरात बसवलेले सिसिटीव्ही कॅमेरे फक्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी बसवण्यात आले आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे सिसिटीव्ही कधीपासून आणि का बंद आहेत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
साहिलचा रंग गोरा असून उंची दीड फूट आहे. तो अंगाने मजबूत असून चेहरा गोल, डोळे काळे, केस भोरे बारीक, त्यास समोरील बाजूस सोनेरी रंगाचा डाय लावलेला, नाक बसके, गळ्यात पंचरंगी धाग्यात गुंफलेली चांदीचे ताईत, दोन्ही हातात चंदनाचे मण्यांची मनगटी, अंगात काळया रंगाचा स्लीव्हलेस टी शर्ट, लाल रंगाचा पायजमा घातलेला आहे. या वर्णनाचा मुलगा कोठे आढळून आल्यास विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.