बच्चू कडूंसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल, मुंबईतील बैठकीनंतर कारवाईचा ससेमिरा
मुंबई : खरा पंचनामा
माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी अनेक नेत्यांवर रस्ता अडविल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेते महादेव जानकर, रविकांत तुपकर, वामनराव चटप, नितेश कराळे, अजित नवले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसांपूर्वी वर्धा मार्ग शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी अडवून धरला होता. या आंदोलनात अनेकांना अन्न पाणी आणि इतर सोयीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा ठपका ठेऊन हिंगणा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत काल रात्री मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
ते म्हणाले, "आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत त्यांनीही याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की, आम्ही पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बाजूने आहोत. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हे त्यांना सांगितलेलं आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले, "या संदर्भात आम्ही असा निर्णय केलाय की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे, या संदर्भातील एक अहवाल द्यावा. या अहवालावर कर्जमाफीसंदर्भातील जो निर्णय आम्हाला करायचा आहे, तो तीन महिन्यात म्हणजेच ३० जून २०२६ पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला असेल"
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.