कोणत्याही व्यासपीठावर मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करू
सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे भुजबळ, मुंडे, पडळकर यांना आव्हान
सांगली : खरा पंचनामा
बीड येथील महाएल्गार सभेनंतर छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे यांच्याकडून मराठा समाजाला ‘टार्गेट’ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बीडमधील सभेत दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान आम्ही स्वीकारतो. नेत्यांनी तारीख, ठिकाण आणि वेळ सांगावी, आम्ही तेथे येऊन मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करू. परंतु त्याचवेळी भुजबळ, मुंडे, पडळकर यांनीदेखील त्यांचे आरक्षण योग्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी प्रशांत भोसले, विलासराव देसाई, नितीन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिले.
ते म्हणाले, राज्यात जाती-जातीमध्ये विष पेरून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप नेत्यांनी मराठा द्वेष सोडून संविधान आणि कायद्यानुसार मराठा व ओबीसींसह सर्वांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. मराठा समाजाचे मागासलेपण आम्ही न्यायालयात सिद्ध करत आहोत, त्याचप्रमाणे बीडमधील महाएल्गार सभेत दिलेल्या आव्हानानुसार खुल्या चर्चेतही ते सिद्ध करण्यास तयार आहोत. गॅझेटमधील नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीत अनेक जातींचा समावेश केला आहे. या जातींना पुढे करून भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. महाएल्गार सभेतील नेत्यांची भूमिका केवळ मराठाविरोधी नसून कुणबी समाजाचा द्वेष करणारी व घटनाविरोधी आहे.
ते म्हणाले, भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे ज्या समाजाचे आहेत, ते समाज घटनात्मक आणि वैधानिकदृष्ट्या आरक्षणाला पात्र नसताना देखील आरक्षणाचा लाभ घेत आहेत. राज्यात ओबीसी व उपवर्गाची लोकसंख्या ३३.८० टक्के आहे. त्यांना शासकीय सेवेत ४३ टक्के जागा मिळाल्या आहेत. भांडाफोड होईल म्हणून भुजबळ, मुंडे व बावनकुळे हे मंत्री ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करण्यास विरोध करत आहेत. धनगर समाजाला एनटीचे ३.५ टक्के आरक्षण लागू आहे. तर वंजारी समाजाला एनटीचे दोन टक्के आरक्षण लागू आहे. मात्र ते २७ टक्के राजकीय आरक्षणावर ओबीसी म्हणून अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचे वैधानिक प्रमाणात वर्गीकरण करावे अशी आमची मागणी आहे. आमचा लढा आरक्षण वाचवण्यासाठी असून जातीविरोधात नाही.
राज्यातील १८६ ते १९० मराठा कुटुंबांनी राज्यातील सत्तेत असताना समाजावर अन्याय केला आहे. आजपर्यंत केवळ घोषणा करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची मानसिकता निर्माण झाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, अशोक पाटील, विजय धुमाळ, तानाजी भोसले, योगेश पाटील, राेहित पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.