मंदिर प्रसिद्ध होईल, जास्त दान मिळेल म्हणून कर्मचाऱ्यानेच फोडले मंदिर!
जुनागढ : खरा पंचनामा
गुजरातच्या जुनागढ इथं श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात तोडफोड झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता गुन्हे शाखेनं तपास करत मोठा उलगडा केला आहे. गिरनार पर्वतावर असलेल्या मंदिरातली मूर्ती तोडून ती जंगलात फेकण्यात आल्याचा आरोप होता.
या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून यापैकी एक जण मंदिरातच काम करत होता. शेकडो सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि लोकांकडे चौकशी केल्यानंतर दोघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रमेश भट्ट आणि मंदिरात आधी काम केलेल्या एका स्थानिक फोटोग्राफरचा समावेश आहे.
रमेश भट्ट आणि किशोर कुकरेजा यांनी मिळून मंदिरातली मूर्ती चोरली. कुकरेजा मंदिरात पगारी नोकर आहे. तो महाराष्ट्रात उल्हासनगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकरेजा दोन वर्षांपासून मंदिरात काम करत होता. मंदिरात फारशी कमाई होत नसल्यानं नाराज होता. लोक पुजेसाठी यावेत आणि दान जास्त मिळावं अशी त्याची इच्छा होती. मंदिराला आणखी प्रसिद्धी मिळावी यासाठीच त्यानं हा कट रचला.
मंदिरातील पुजारी योगी सोमनाथ यांना ५ ऑक्टोबर रोजी मूर्ती चोरीला गेल्याचं आढळलं. मंदिरात तोडफोडही करण्यात आली होती. कुकरेजाने त्यांना सांगितलं होतं की, चार अज्ञातांनी मंदिरात तोडफोड केली. यावर विश्वास ठेवत सोमनाथ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर जैन समाजातील लोक आक्रमक झाले होते. दोषींना अटक करण्याची मागणी केली जात होती.
पोलिसांनी या घटनेचा तपास करताना १५६ जागी लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. जवळपास ५०० भाविकांच्या येण्याजाण्यावर नजर ठेवली. परिसरात काम करणाऱ्या २०० जणांची चौकशी करण्यात आली. हॉटेल आणि धर्मशाळेच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. यानंतर कुकरेजा आणि भट्ट यांनी ४ ऑक्टोबरला रात्री आरतीनंतर काच तोडून दरवाजा उघडत ५० किलोची मूर्ती चोरी केल्याचं आढळून आलं.
मंदिरात मूर्ती चोरीला गेल्याचं आणि तोडफोड झाल्याचं समजल्यानंतर वाद निर्माण होईल. मंदिराला प्रसिद्धी मिळेल आणि भाविकांची संख्या वाढेल. भाविक जास्त आल्यास मंदिरात मिळणारे दानही वाढेल. यामुळे जास्त पैसे मिळतील असं भट्ट आणि कुकरेजा यांना वाटत होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.