पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून आंदोलन
विधान भवन परिसरात २ तास नाट्य
मुंबई : खरा पंचनामा
वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास त्याचे आंदोलन सुरू होते. विधान भवनाबाहेरील झाडावर शनिवारी सकाळी चढून या व्यक्तीने दोन तास आंदोलन केले.
'वाहतूक पोलिसांनी दंड केल्याने मी जीव देण्यासाठी झाडावर चढलो', असे तो सांगत होता. अखेर कफ परेड पोलिसांनी झाडावर चढून समजूत काढून त्याला खाली उतरवले. तो नशेत असल्याचे वायफळ बडबड करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
विधान भवनाबाहेर शनिवारी सकाळी अचानक गोंधळ सुरू झाला. सकाळी १० वाजता एक इसम झाडावर चढून बसला होता. मी वरून उडी मारून जीव देईन असे तो वारंवार सांगत होता. ते पाहून बघ्यांची गर्दी जमली. तो खाली उतरायला तयार नव्हता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तो काय बोलत होता हे समजत नव्हते. पोलीस त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत होते. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस झाडावर चढू लागताच तो उडी मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
हा पेच सोडवायचा कसा असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस त्याला समजावून दमदाटी करून थकले. शेवटी कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड त्याच्या कलाने घेत झाडावर चढले. त्याच्याशी प्रेमाने बोलू लागले. तुझी अडचण दूर करू, तुझी मागणी पूर्ण करू असे सांगत त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वायफळ बडबड करीत होता. माझ्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, मराठी माणसांना स्टॉल्स लावू देत नाही, असे तो सागत होता. मात्र गायकवाड यांनी चातुर्याने समजूत घालून त्याला खाली आणले. तो खाली येतात त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान हे नाट्य सुरू होते.
संपत चोरमले (३२) असे या इसमाचे नाव आहे. तो खासगी अॅप आधारित टॅक्सीचा चालक आहे. डोंगरी येथे वास्तव्यास असलेला संपत नशेत होता, त्यामुळे तो काहीही बडबडत होता असे पोलिसांनी सांगितले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. आंदोलन करणारा संपत विक्षिप्त आहे. तो पदपथावरच राहतो आणि खासगी अॅप आधारित टॅक्सी चालवतो. त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. आम्ही टॅक्सीच्या मालकाला बोलावले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.