शासकीय कर्मचा-यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मारहाण करणा-यास शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
सरकारी कर्मचा-यास शिवीगाळ करुन, मारहाण करुन जखमी करुन, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल एकाला 4 वर्षे कैद व 7 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास अडीच वर्षे साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्राह्म यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रियाज एस. जमादार यांनी काम पाहिले.
चंद्रकांत हिंदूराव पवार (वय 55, रा. तासगांव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. चंद्रकांत पवार यांचे चिंचणी रोड, तासगाव येथे चंद्रसेन कोल्ड स्टोरेज यांचे थकीत विजबील 2.38 लाख रुपये होते. ती रक्कम भरण्यासाठी सांगणेबाबत यातील फिर्यादी किरण कल्याणराव भोईटे, सहा. अभियंता महावितरण तासगांव हे व त्यांचे सहकारी अमर भरत ढोबळे हे चंद्रसेन ट्रेडींग कंपनी येथे गेले असता, आरोपी चंद्रकांत पवार यांनी फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन, "तुमचे पैसे भरत नाही, तुला जिवंत ठेवत नाही, तुम्हाला लई मस्ती आली आहे" असे म्हणून लोखंडी सळी घेवून फिर्यादीच्या अंगावर आले तो फिर्यादीने अडवला असता डाव्या हातातील स्टील तांब्याने फिर्यादीच्या तोंडावर मारले, फिर्यादीच्या गचोटीला धरुन छातीत जोरात बुक्क्यांनी मारले. त्यावेळी शर्टाची बटने तुटून शर्ट फाटला. फिर्यादीच्या नाकाचे हाड फॅक्चर होवून रक्तस्त्राव होवून शर्ट रक्ताने भरला, अशा रितीने सरकारी कामात आरोपीने अडथळा केला. त्यामुळे वरील गुन्हयाअनुशंगाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशसोो एन. के. ब्राह्म यांनी वरीलप्रमाणे आरोपी चंद्रकांत पवार यांना शिक्षा ठोठावली.
सदरकामी एकूण आठ साक्षीदार तपासले असून, फिर्यादी किरण भोईटे यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली त्याचबरोबर, डॉ. निलेश महानंगरे, डॉ. पंकज पवार व डॉ. अक्षय कुलकर्णी यांचीही साक्ष महत्वाची ठरली. सहायक पोलीस निरीक्षक यू. एम. दंडिले यांनी याचा तपास केला. आरोपीविरुद्ध दोषारोप सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार यांनी दाखल केले. सदरकामी तासगांव पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी रविंद्र बी. माळकर व अन्य सर्व पैरवी पोलीसांचे सहकार्य लाभले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.