'डिजिटल अरेस्ट'मध्ये झालेल्या फसवणुकीतून सेवानिवृत्त शासकीय अधिकार्याचा हृदयविकाराने मृत्यु
पुणे : खरा पंचनामा
मनी लॉन्ड्रींगच्या कारवाईची भिती दाखवून ८० वर्षाच्या महिलेची १ कोटी १९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्ध दांम्पत्याने सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दिली. तरीही त्यांची दखल घेतली गेली नाही. हे वृद्ध नागरिक महाराष्ट्र शासनामध्ये अभियंता म्हणून उपसंचालक पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान, फसवणुकीत त्यांचे सर्व पैसे गेल्याने त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही. ते उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांची फी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यातूनच वृद्ध पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली आहे.
याबाबत एका ८० वर्षाच्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला व तिचे पती हे गेल्या २५ वर्षांपासून टिंगरेनगर रहात असून त्यांच्या तीन मुली नोकरीनिमित्त अमेरिका येथे असतात. पेन्शन खात्यातून पैसे काढून ते उदरनिर्वाह चालवितात. त्यांची मुलगी त्यांना आर्थिक मदत करत असते. सायबर चोरट्यांनी १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या पतीच्या मोबाईलवर संपर्क साधून कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. नरेश गोयल या आरोपीने करोडो रुपयांचा फ्रॉड केला असून त्यात तुमच्या नावाने कॅनरा बँकेत खाते बनवले आहे. त्या खात्यातून हा फ्रॉड केलेला आहे.
अनैतिक मानवी तस्करीमध्ये देखील या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुमचा सहभाग आहे अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची माहिती देण्यासाठी नोटिस पाठवली. त्यांनी ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. त्याच्या इतर साथीदारांना अटक करणार आहोत, असे सांगून सीबीआय अधिकारी दया नायक यांना फोन जोडून दिला. त्याने तुम्हाला जेल अरेस्ट किंवा होम अरेस्ट चालेल असे विचारले. त्यावर त्यांनी अटकेला घाबरुन होम अरेस्ट चालेल, असे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल केला. त्यात त्यांच्या पतीला अॅड केले.
त्यांनी ते सर्व पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याकरीता गेल्या असताना कायम व्हाइस कॉलवर संपर्कात होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँक खात्यामधून २१ ऑगस्ट रोजी १४ लाख रुपये, ८ सप्टेंबर रोजी ३० लाख रुपये, १५ सप्टेंबर रोजी २० लाख रुपये, १८ सप्टेंबर रोजी २५ लाख रुपये आणि १७ सप्टेंबर रोजी ३० लाख रुपये असे एकूण १ कोटी १९ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही ते अधिक पैसे मागू लागल्याने त्यांना संशय आला. तेव्हा त्यांच्या पतीने २२ सप्टेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दिली.
८० वर्षाच्या महिलेची फसवणूक झाली असतानाही त्यांनी तक्रार दिल्यानंतरही त्याची दखल घेतली गेली नाही. फसवणुकीचा हा धक्का बसल्याने त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. वडिलांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर अमेरिकेतून त्यांची मुलगी परत आली. तिच्याशी संपर्क साधला असता तिने आपल्या आईवडिलांनी जवळपास एक महिना कोणत्या अवस्थेत दिवस काढले याची माहिती दिली.
अटकेच्या भितीने त्यांनी आपली वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुक केलेली संपत्ती मोडली. बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना त्याबाबत विचारणाही केली. पण, अटकेची भिती इतकी त्यांच्या मनावर होती. शिवाय तुम्ही कोणाला काही सांगितले तर, तुमच्या मुलीला त्रास होईल, अशी भिती घातली होती. त्यामुळे त्यांनी बँक अधिकाऱ्यांना शाळेला देणगी द्यायची आहे, असे चक्क खोटे सांगितले होते, अशी माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.