शरद पवार अध्यक्ष असलेल्या 'या' संस्थेची होणार चौकशी..!
मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
पुणे : खरा पंचनामा
राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट या प्रतिष्ठित संस्थेला मिळणाऱ्या शासन अनुदानाच्या वापराबाबत चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने या संदर्भात निर्णय घेतला असून, आयुक्त (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही समिती व्हीएसआयला मिळालेल्या शासन अनुदानाचा वापर नियोजित उद्देशानुसार झाला आहे का, याची सखोल तपासणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.
व्हीएसआय ही राज्यातील साखर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली संस्था मानली जाते. या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, तर उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांसारखे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, "ही चौकशी म्हणजे पवार काका-पुतण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे का?" अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. विशेषतः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने राजकीय पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.
व्हीएसआयला दरवर्षी शासनाकडून 5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिले जाते. तसेच राज्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रति टन एक रुपया आकारला जातो. हा निधी संस्थेच्या संशोधन आणि विकास कामांसाठी वापरला जाण्याचा उद्देश आहे. परंतु या अनुदानाचा खरोखरच मूळ हेतूनुसार वापर झाला आहे का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था 1975 मध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी स्थापन केलेली आहे. साखर उद्योगातील वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात काम करणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे. तसेच राज्यात सहकार चळवळ मजबूत करण्यात व्हीएसआयची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.