रत्नाकर बँकेच्या अधिग्रहणप्रक्रियेत स्थानिक हित अबाधित ठेवावे
भाजपा जैन प्रकोष्टचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांची जनहिताची मागणी
सांगली : खरा पंचनामा
सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव परिसराच्या आर्थिक घडणीत ऐतिहासिक स्थान असलेल्या रत्नाकर बैंक लिमिटेड (आरबीएल बँक) या स्थानिक बँकेच्या दुबईस्थित NBD कंपनीकडून अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे जनतेत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि भाजपा जैन प्रकोष्टचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब जीनगोंडा पाटील यांनी या विषयावर रत्नाकर बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आर एस कुमार, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून जनहिताचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
श्री. पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, रत्नाकर बँकेची स्थापना ही सांगली-कोल्हापूर-बेळगाव या परिसरातील जैन समाजातील धुरीण, सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकरी वर्गाच्या प्रयत्नांतून झाली. या बँकेच्या जडणघडणीत आणि वाढीत या परिसरातील लोकांचा घाम, प्रामाणिकपणा आणि विश्वास गुंतलेला आहे. आज या बँकेत हजारो ग्राहक, लघु व मध्यम व्यावसायिक, शेतकरी आणि सुमारे ७०० कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. त्यामध्ये जैन समाजाबरोबरच विविध समाजघटकांतील कर्मचारी आणि ग्राहक यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून रत्नाकर बँक आज ज्या उंचीवर पोहोचली आहे, ती घडवली आहे.
म्हणूनच, बँकेच्या नव्या अधिग्रहणानंतर या सर्व संबंधित घटकांचे पूर्वीचे हक्क, सेवाशर्ती, नोकरीतील स्थैर्य आणि स्थानिक आर्थिक हितसंबंध अबाधित ठेवावेत, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे. तसेच, रत्नाकर बँक ज्या मातीतून जन्मली, ज्या समाजाने तिला बळ दिले, त्या समाजाशी नव्या व्यवस्थापनाने कृतज्ञतेने नातं जपावं, आणि या परिसरातील व्यवसाय, शेती व सामान्य ग्राहकवर्गाला प्राधान्य द्यावं, अशी जनहिताची अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी शासन व बँक व्यवस्थापनाला या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.