"आरोपीला सोडा आणि पुन्हा अटक करा"
मुंबई : खरा पंचनामा
मूकबधिर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला सोडून त्याला पुन्हा अटक करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. आरोपीला केलेली अटक बेकायदा असल्यानं त्याच्या सुटकेचे आदेश देण्यात आलेत.
गुरुवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपीची आधी सुटका करा आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याला पुन्हा अटक करता येऊ शकते असंही न्यायालयाने पोलिसांना सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीच्या सुटकेचे आदेश देताना असंही स्पष्ट केलं की, ही सुटका जामिनावर झालेली नाही. त्याला करण्यात आलेली अटक ही बेकायदा आहे. औपचारिकरित्या अटक करण्याआधी पोलीस ठाण्यात २४ तास ठेवलं होतं. अटकेनंतर २४ तासांच्या आत आरोपीला दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करणं बंधनकारक असतानाही २४ तासानंतर हजर केलं गेलं. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असून त्याला सोडणं भाग असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.
दरम्यान, न्यायालयाने तपास यंत्रणेला फटकारलं. तपास यंत्रणांच्या चुकीबाबत न्यायालयाने म्हटलं की, पोलिसांच्या चुकीमुळे पीडितेला नाहक त्रास सहन करायला लागू नये. पोलिसांना आरोपीला पुन्हा अटक करण्याची मुभा देण्यात येत आहे.
आरोपी एका इमारतीत सुपरवायझरचं काम करत होता. त्याच इमारतीत मुकबधिर महिला घरकाम करण्यासाठी यायची. ती घरातली कामे आटोपल्यानंतर इमारतीतल्या पार्किंगच्या जागेची साफसफाई करत होती. त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.