महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गोपाळ बदनेला पाच दिवसाची पोलीस कोठडी
फलटण : खरा पंचनामा
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. आत्महत्येच्या या घटनेत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर केले. त्यानंतर कोर्टाने 30ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फलटण सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर 'माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,' असे लिहून ठेवले होते.
फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणातील दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. गोपाल बदने यांनी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे आरोप आहेत. बदने शनिवारी रात्री उशिरा स्वतःहून फलटण पोलिसांसमोर सरेंडर झाला आहे. त्यानंतर रविवारी बदनेला फलटण न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी फलटण न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने या प्रकरणी आरोपी बदनेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता बदने यांची रवानगी आता ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत होणार आहे.
आरोपीचे वकील राहुल धायगुडे यांनी युक्तिवाद करताना मयत डॉक्टर युवतीने तिच्यावर कुठे कुठे कोण कोणत्या ठिकाणावर बलात्कार झाला हे नमूद केले नाही. हे आरोप पोलिस अधिकारी बदने आणि डॉक्टर युवतीसोबत असणाऱ्या वादातून मयत युवतीने केले आहेत. हे आरोप मोघम आहेत, त्याला कोणताही पुरावा नाही, असे सांगितले.
तर सरकारी वकील यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश सांगत मरणारा व्यक्ती कधी खोटे बोलत नसतो, असा युक्तिवाद केला आणि म्हणूनच यात पोलिसांना तपासासाठी वेळ मिळणे गरजेचे असल्याचे युक्तिवाद केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रशांत बनकरला कोर्टाने यापूर्वीच २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत बनकरवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केला होता. त्यामुळे पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.