Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"सांगलीचा समीर पाटील सांगतो तेच पुण्यात चालत"

"सांगलीचा समीर पाटील सांगतो तेच पुण्यात चालत"

पुणे : खरा पंचनामा

गेल्या महिन्यात कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पुण्यातील टोळीयुद्ध समोर आले. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये महायुतीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

त्यांचा आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ यांचा थेट संबध असल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर महायुतीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धंगेकर यांच्या विधानाची दखल घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदेंनी यांनी भेट घेऊन धंगेकर यांना समज दिली. तरीही सोमवारी (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा समीर पाटील यांच्यावर निशाणा साधला.

"गुन्हेगारांमुळे पुणे शहराची बदनामी झाली आहे. मी एक नेता म्हणून नव्हे तर एक पुणेकर म्हणून मंत्र्यांना प्रश्न विचारत आहे. पुणे शहर हे भयमुक्त झाले पाहिजे एवढाच माझा त्यामागे उद्देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोथरूडसह पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे मी बोलत आहे. त्यावरून मी फक्त एक साधा प्रश्न तेथील सत्ताधाऱ्यांना की निलेश घायवळ टोळीचे सदस्य, त्यांचे प्रमुख लोकं चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असतात, याचा खुलासा करावा असे मी म्हटले." असे स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

"सचिन घायवळच्या पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि पुणे पोलिसांची नाचक्की झाली. त्यांना इंटरपोलची मदत घ्यावी लागली. पोलिसांच्या नाचक्कीला जबाबदार हे चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार आहेत. तुमचा आधार घेऊन जर या पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असेल तुम्ही त्याचा खुलासा करावा, असा माझा प्रश्न होता. पण त्यानंतर समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली. हा व्यक्ती चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मी त्याला कधी पाहिलेच नाही. त्याने माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला." असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्याबाबत अनेक दावे केले आहेत.

"चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर समीर पाटीलला राग आला. म्हणून मी हा समीर पाटील कोण म्हणून शोधायला गेलो. त्याने असा दावा केला की माझ्यावर एकही केस नाही. पण मी याचा शोध घेण्यासाठी सांगलीला गेलो तेव्हा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे मला आढळले. समीर पाटील याच्यावर मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल असून सांगलीमध्ये त्याच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. समीर पाटील सांगतो तेच पुणे पोलिसांत चालते. कोणावर गुन्हे दाखल करायचे आणि कोणावर नाही? हेही तोच ठरवत असल्याचे पोलिसांनी बोलल्यानंतर कळले. यावरून मी फक्त चंद्रकांत पाटील यांना खुलासा करायला सांगितले." असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. "माझे भांडण भाजपशी नाहीच आहे, एक पुणेकर म्हणून लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारत आहे," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.