स्मशानभूमीतून महिलेची कवटी गायब; अघोरी कृत्याचा संशय
जळगाव : खरा पंचनामा
शहरातील चोरट्यांनी अक्षरशः कहर केलाय, जिवंतपणात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मृत्यूपश्चात दागिन्यांसाठी चक्क स्मशानातून अस्थीच चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मेहरुण स्मशानभूमीतून मंगळवारी (ता.७) गायत्री नगरातील छबाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्या.
या घटनेचा तपास लागत नाही तोच सोमवारी (ता. १३) शिवाजीनगर स्मशानभूमीतून जिजाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
शहरातील गायत्री नगरातील छबाबाई काशिनाथ पाटील या मृत महिलेच्या अस्थी मेहरुण स्मशानभूमीतून चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (ता. ७) उघडकीस आली. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली असून, आम्हाला सोनं नकोय केवळ आमच्या आईच्या अस्थी परत करा, असा आर्त टाहो फोडला होता. या घटनेला आठवडा उलटत नाही तोवर आज (ता.१३) शिवाजीनगर स्मशानभूमीतून परत दागिन्यांसाठी एका महिलेच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
शहरातील खडके चाळ (शिवाजी नगर) येथील जिजाबाई प्रताप पाटील या वृद्धेचा मृत्यू झाला. पाटील कुटुंबीयांतर्फे शिवाजीनगर स्मशानभूमीत शनिवारी (ता. ११) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १३) मृताचा नातू शुभम, मुलगा मंगल पाटील व इतर नातेवाईकांसह सारी सरकवण्यासाठी गेले होते. त्यांना विझलेल्या चितेजवळ नैवेद्य ठेवल्याचे आढळून आले. पाटील कुटुंबीयांनी चितेची पाहणी केल्यावर त्यांना चितेची राख अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले. तसेच, मृत जिजाबाई पाटील यांच्या कवटीचा भाग, पायाकडील भाग व इतर अवषेश नसल्याचे आढळून आले. घडल्या प्रकाराबाबत तत्काळ पाटील कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांना घटना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाटील कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांत चितेला नैवेद्य दाखविण्याची प्रथाच नाही. आज सकाळी आम्ही जेव्हा सारी सरकवण्यासाठी आलो तेव्हा चितेजवळ नैवेद्य ठेवण्यात आला होता. तसेच चितेतून कवटीचा भाग, पायाचे अवशेष गायब होते. मृत जिजाबाईंच्या अंगावर चार ग्रॅम सोने होते. ते सोने मिळविण्यासाठी चिता कोरली असती तर अवशेष तिथेच ठेवले असते. परिणामी, या प्रकरणात अघोरी कृत्यांचाही संशय व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.