जामीनासाठी सव्वा लाखाची लाच स्वीकारताना पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
डोंबिवली : खरा पंचनामा
एका गुन्ह्यातील अटक आरोपीला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या पित्याकडून सव्वा लाख रूपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला अटक करण्यात आले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदार कर्मचाऱ्यारी यांच्यावर ही कारवाई झाली.
ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ऐन दिवाळीत झालेल्या कारवाईने खळबळ माजली आहे. सापडलेल्या या दोन्ही पोलिसांच्या विरोधात ते कार्यरत असलेल्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम गंगाराम जोशी (५७) आणि विजय वामन काळे (३८) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही खडकपाडा पोलिस ठाण्याशी संबंधित आहेत. या प्रकरणी लाच विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद अहिरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
यातील ६७ वर्षांचे तक्रारदार असून त्यांच्या मुलाविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सहकार्य करावे, मुलाला लवकर जामीन मिळावा, यासाठी वयोवृद्ध तक्रारदार प्रयत्नशील होते. प्रयत्न सुरू असताना तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम जोशी यांनी तक्रारदारांकडे ३ लाख रूपयांची मागणी केली. त्यासाठी सपोनि जोशी यांनी पैशांसाठी तक्रारदारांकडे तगादा लावला. अखेर तक्रारदाराने या संदर्भात ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शनिवार, रविवार पडताळणी/खातरजमा केली. त्यामध्ये सपोनि जोशी तीन लाखांची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. सपोनि जोशी यांच्या सूचनेवरून हवालदार विजय काळे यांनी तक्रारदाराची भेट घेतली. तडजोडीअंती तक्रारदाराकडे दोन लाख रूपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम सव्वा लाख रूपये देण्याचे ठरले. ही रक्कम सपोनि तुकाराम जोशी यांच्या इशाऱ्यावरून विजय काळे यांने कल्याण पश्चिमेतील डी. बी. चौकात असलेल्या डॉन बॉस्को शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर तक्रारदाराकडून स्वीकारली.
तेथे सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोना विजय काळे याला सव्वा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने खडकपाडा पोलिस ठाण्यातून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सहाय्यक निरीक्षक तुकाराम जोशी यांनाही पथकाने ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.