"मुंबईत उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी ७५ हजार कोटींची तरतूद"
अमरावती : खरा पंचनामा
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले असले, तरी याबाबत सरकारने टाळाटाळ चालवली असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. ते सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करीत आहेत.
सरकारकडे पैसा आहे, पण तो शेतकऱ्यांसाठी नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी महायुती सरकारने गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या घरांसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली जात आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, सत्ताधारी लोकांकडून सातत्याने निधीची चणचण असल्याचे वक्तव्ये केली जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैशांचे सोंग घेता येत नाही. पण, तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केले, सुर्योदय होण्याच्या आधी तुम्ही शपथविधीसाठी तयार होते. तेव्हा ते कोणते सोंग घेऊन होते. आता सोंग होत नसेल, तर पदावर राहता कशाला, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
सरकारजवळ शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, पण निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींसाठी सरकारने कशी तरतूद केली. तेव्हा महाराष्ट्राचे बजेट बिघडले नाही. सर्वकाही मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे. शेतकऱ्यांना किमान दिलासा देणारे लोक देखील सत्ताधारी पक्षांमध्ये उरले नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.