फास्टटॅग नसलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा, महामार्ग मंत्रालयाने केले मोठे बदल
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टटॅग नियमांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. आता जर तुमच्या वाहनात वैध फास्टटॅग नसेल किंवा तो खराब असेल, तरीही दुप्पट टोल भरावा लागणार नाही.
त्याऐवजी, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट केल्यास फक्त १.२५ पट टोल शुल्क भरावे लागेल. हा बदल १५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणार असून, त्यामुळे टोल प्लाझावर रोख व्यवहार कमी होईल आणि प्रवास अधिक सोपा होईल.
पूर्वीचे नियम आणि नवीन बदल काय ?
फास्टटॅगशिवाय चारचाकी किंवा जड वाहन चालकांना दुप्पट टोल रोखीने भरावा लागत होता. उदाहरणार्थ, जर टोल शुल्क १०० रुपये असेल, तर २०० रुपये रोखीने द्यावे लागत. यामुळे टोल प्लाझावर गर्दी आणि वेळेचा अपव्यय होत असे.
आता फास्टटॅग नसल्यास किंवा तो अवैध / खराब असेल, तर UPI द्वारे पेमेंट केल्यास केवळ १.२५ पट शुल्क (उदा. १०० रुपयांसाठी १२५ रुपये) भरावे लागेल. रोख पेमेंटसाठी मात्र दुप्पट शुल्क कायम राहील. याचा उद्देश टोल संकलनात रोख गळती रोखणे आणि डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देणे हा आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी सुमारे १०,००० कोटी रुपयांची टोल गळती होत असल्याचे केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी सांगितले होते. सध्या ९८ टक्के टोल संकलन फास्टटॅगद्वारे होते, ज्यामुळे प्लाझावर सरासरी वाट पाहण्याचा वेळ ४७ सेकंदांपर्यंत खाली आला आहे. हा नवीन नियम टोल प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि वाहनधारकांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी आणला गेला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.