Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी"

"ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी"

नवी दिल्ली : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या डॉक्टर तरुणीने स्वतःचं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहित दोन जणांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय आणि आणखी एकाला पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या या प्रकरणावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत. "ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे", असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसेच या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

"बलात्कार आणि छळाला कंटाळून महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथील एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी, भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली. ज्याला गुन्हेगारांपासून जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्याने या निष्पाप मुलीवर सर्वात भयंकर गुन्हा केला, तिच्यावर बलात्कार आणि तिचं शोषण केलं", असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

"भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेने संरक्षित असलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही, तर ती संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने या भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबाबरोबर खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला न्याय हवा आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.