तासगाव नगरपरिषदेचा भोंगळ कारभार !
४४ कोटींचा भुयारी गटार प्रकल्प रखडला : कंत्राटदाराकडून नगर परिषदेला ६ कोटी वसुलीची कायदेशीर नोटीस
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तासगाव शहरातील सुमारे ४४ कोटी रुपयांचा भुयारी गटार प्रकल्प रखडला आहे. नवीन ड्रेनेज पाइपलाइन व मलनि:सारण केंद्र उभारणीसाठी आवश्यक जागा नगरपरिषदेकडून उपलब्ध करून न दिल्याने या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत.
या प्रकल्पाचे कंत्राट मे. नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे यांना देण्यात आलेले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची या प्रकल्पावर देखरेख आणि सल्लागार म्हणून नियुक्ती होती. कंपनीने तासगाव मध्ये आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधनांची उभारणी, भरीव अनामत रक्कम, मुद्रांक शुल्क आणि आर्थिक गुंतवणूक करून काम सुरु केले होते. मात्र, तासगाव नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे, निष्क्रियतेमुळे व प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रकल्पाचे काम बंद पडले.
या निष्काळजी कारभारामुळे मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळणे, नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचणे, दुर्गंधी पसरणे, पर्यावरणाचे नुकसान, सार्वजनिक आरोग्यावर परिणाम आणि नागरिकांची गैरसोय अशा समस्या उद्भवत आहेत.
अनेक राज्यांमध्ये काम करणाऱ्या मे. नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे चे मालक व संचालक श्री राजेंद्र शंकरराव कुत्ते हे मूळचे तासगाव चे रहिवासी असून त्यांनी तासगाव शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले होते. नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पाहता त्यांच्या कंपनीच्या वतीने अॅड. ध्यानंजय मद्वाण्णा लॉ फर्म, सांगली यांनी तासगाव नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि शासनाला सहा कोटी रुपयांच्या थकबाकी व नुकसानभरपाईच्या मागणीसाठी कायदेशीर नोटीस दिलेली आहे. नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.