Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"भविष्यात पोलिसांच्या हाती काठी नव्हे तर टॅबलेट द्यावा लागेल!"

"भविष्यात पोलिसांच्या हाती काठी नव्हे तर टॅबलेट द्यावा लागेल!"

मुंबई : खरा पंचनामा

२०४७ मध्ये मुंबईची लोकसंख्या दुप्पट झालेली असेल. त्यातुलनेत पोलिसांची संख्या वाढेलही. पण गुन्हेगारीचे बदलते स्वरूप पाहता भविष्यात पोलिसाच्या हाती काठी नव्हे तर टॅबलेट द्यावा लागेल, असे प्रतिपादन मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

'व्हिजन मुंबई २०२४' या लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ड्युटीवर असलेला पोलीस टॅबलेटवरच गुन्हा दाखल करील, अशी संकल्पना राज्य शासनाने सादर केलेल्या व्हिजन पत्रातही मांडण्यात आल्याचे सांगून भारती म्हणाले की, आतापर्यंत आपण साधारण घडणारे गुन्हे पाहिले आहे. परंतु काळ असा आहे की, एखादे ड्रोन येऊन सोनसाखळी चोरी नोंदली जाईल. कृत्रिम बौद्धिक संपदेचा अनैतिक वापर होण्याची शक्यता टाळता येत नाही. भविष्यातील गुन्हेगारीचा या पातळीवर आम्ही विचार सुरु केला आहे.

सायबर गुन्हेगारीत वाढ होत चालली असली तरी या गुन्ह्यांत बसणारा मोठा आर्थिक फटका कसा कमी करता येईल या दिशेने विचार सुरु झाला आहे. १९३० या क्रमांकावर गुन्हा घडल्यावर पहिल्या पाच मिनिटांत माहिती दिल्यास गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळू शकणार आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ४५० कोटी रुपये परत मिळवले आहेत, असेही भारती यांनी सांगितले. आज सायबर गुन्ह्यांत गुन्हेगाराकडून फसवणुकीची रक्कम अनेक खात्यांमध्ये काही मिनिटांत हस्तांतरित केली जाते. परंतु त्यातही क्रांतिकारी बदल होऊन भविष्यात बँकेतील संपूर्ण रक्कम गायब करण्यापर्यंत मजल जाऊ शकते, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही सुसज्ज व्हायचा प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ला हा जसा कल्पनेपलीकडचा होता, तसाच २६/११ चा मुंबईवरील हल्ला होता. भविष्यात असे कल्पनेपलीकडील दहशतवादी हल्ले कुठले असू शकतात, याचेही विचारमंथन सुरु असल्याचे भारती यांनी सांगितले.

समाज माध्यम सध्या इतके सक्रिय आहे की, भविष्यात ते कुठल्या थरापर्यंत पोहोचू शकेल हे आपण सांगू शकत नाही. आज जात आणि धर्मावर आधारीत गटबाजी वाढली आहे. त्यामुळे जातीय तणाव वेगळी पातळी गाठू शकतो. आत्तापर्यंतची पारंपरिक पद्धत पोलिसांना निश्चितच बदलावी लागणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाहतूक व्यवस्थेत वाढ झाल्याने पोलिसांवर सुरक्षेचा ताण पडणार आहे. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेची आम्हाला मदत घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.