IRCTC भ्रष्टाचार प्रकरणी आरोप निश्चित
लालू यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवींविरुद्ध खटला चालणार
दिल्ली : खरा पंचनामा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठी कारवाई झाली आहे.
दिल्लीच्या साऊथ अव्हेन्यू कोर्टाने आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी लालू यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. सोमवारपासून या तिघांवर खटला चालवण्यात येणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितले. दिल्ली कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे बिहारच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हं दिसत आहेत.
आयआरसीटीसी (IRCTC) भ्रष्टाचार प्रकरणात दिल्ली राउज कोर्टाने लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे ऐन बिहार निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर) सकाळी, दिल्ली कोर्टाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले. इतकंच नाही तर कोर्टाने आरोपींच्या युक्तिवादाला असहमती दर्शविली. कोर्टाने लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह सर्व आरोपींच्या उपस्थितीत आरोप निश्चित केले आहेत. कथित भ्रष्टाचार झाला तेव्हा लालू यादव हे रेल्वे मंत्री होते. त्यांनी पदाचा गैरवापर करून कट रचला, असे कोर्टाने म्हटलं आहे. निविदा प्रक्रियेत लालूंनी हस्तक्षेप केला होता. या प्रकारामुळे भारतीय रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लालू यादव यांच्यासह सर्व आरोपींवर हॉटेल वाटपात अनियमितता आणि लाच घेतल्याचा देखील आरोप आहेत.
संपूर्ण प्रकरण लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट एका फर्मला देण्यात आलेल्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे. सीबीआयने (CBI) या प्रकरणात लालू यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध फसवणूक, फौजदारी कट आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. तिघांकडून असा युक्तिवाद करण्यात आला आहे की सीबीआयकडे या केसमध्ये खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या प्रकरणात लालू प्रसाद यादव हे आरोपी क्रमांक 1, राबडी देवी आरोपी क्रमांक २ आणि तेजस्वी यादव आरोपी क्रमांक 3 आहेत. यांच्याव्यतिरिक्त 11 अन्य आरोपी देखील आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्यावर आयपीसी (IPC) कलम 120 बी (कट रचणे), 420 ( आर्थिक फसवणूक) आणि त्याव्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) कलम 13 - 1 (डी) आणि 13 आणि 13 (2) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.