अजितदादांच्या वर्चस्वाला भाजपचा शह?
ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तोडगा काढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच या असोसिएशनचे अध्यक्ष राहतील तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष असतील. त्याचसोबत मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्यानंतर मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या दोन गटात थेट लढत होणार हे निश्चित झालं होतं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये सामोपचाराने तोडगा काढल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्यानुसार, अजित पवार हेच असोसिएशनचे अध्यक्ष राहतील. तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. अजित पवार गटाला 10 जागा तर मोहोळ गटाला 11 जागा देण्यात येतील.
अजित पवारांना अध्यक्षपद दिलं असलं तरी असोसिएशनच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाचे ठरणारे सचिवपद हे मोहोळ गटाला देण्यात येणार आहे. तसेच खजिनदारपदही मोहोळ गटाकडेच राहणार असल्याची माहिती आहे.
ऑलंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असा सामना जाहीर झाल्यानं फक्त क्रीडाच नव्हे तर राजकीय क्षेत्राच्या नजरा देखील या निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर निवडणुकीआधीच सामोपचाराने तोडगा काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं सांगितलं जात आहे.
गेली तीस वर्षे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर अजित पवारांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला भाजपने यावेळी आव्हान दिलं. अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर भाजपने दबाव टाकण्यास सुरुवात केली. अजित पवारांचे विश्वासू आणि महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगांवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला. त्याचवेळी भाजपचे संदीप जोशी यांनी थेट अजित पवारांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले.
अजित पवार जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना भाजपच्या सत्तेचा अनुभव आला. मात्र त्यावेळीही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर त्यांचे एकहाती वर्चस्व होतं. नंतर ते काका शरद पवारांना सोडून भाजपचे मित्र बनले. आता मित्रपक्ष बनल्यावर देखील अजित पवारांना भाजपच्या सत्तेचा तोच अनुभव येत असल्याचं चित्र आहे. त्यातून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अनेक महत्वाच्या पदांवर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.