Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दलित महासंघाचा अध्यक्ष उत्तम मोहिते याचा वाढदिवसाच्या दिवशीच निर्घृण खून : सांगलीत खळबळहल्लेखोराचाही मृत्यू?

दलित महासंघाचा अध्यक्ष उत्तम मोहिते याचा वाढदिवसाच्या दिवशीच निर्घृण खून : सांगलीत खळबळ
हल्लेखोराचाही मृत्यू?

सांगली : खरा पंचनामा 

दलित महासंघाचा अध्यक्ष उत्तम मोहिते (वय 41, रा. गारपीर चौक, सांगली) याचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी मोहिते याचा वाढदिवस होता. तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान मोहिते याच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाहरुख उर्फ शेऱ्या शेख (वय 30, रा. इंदिरानगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी संशयित शेख तेथे गेला होता. त्यावेळी मोहिते आणि त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. 

त्यानंतर शाहरुखने गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने मोहिते याच्यावर सपासप वार केले. मोहिते याने डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला. वार एवढे जोरदार होते की त्यामध्ये त्याची आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता. 

हल्ला झाल्यावर मोहिते जागेवरच कोसळला. ते पाहून त्याच्या वाढदिवसासाठी जमलेल्यानी शेखला पकडून बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अति दक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता.

उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. मोहिते याचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्याचे नातेवाईक, मित्र, समर्थक यांनी सिव्हिल परिसरात गर्दी केली होती. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.