उत्तम मोहिते खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
आतापर्यंत चौघांना अटक : सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
दलित महासंघाचा (मोहिते गट) अध्यक्ष उत्तम जिनाप्पा मोहिते याचा त्याच्या वाढदिवसा दिवशीच गेम करणारा मुख्य सूत्रधार गणेश मोरे याच्यासह दोघांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेश मोरे, सतिश लोखंडे यांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली तर योगेश शिंदे, अजय घाडगे यांना बुधवारीच अटक करण्यात आली होती. मोहिते याच्या खूनप्रकरणी गणेश मोरे, सतीश लोखंडे, मृत शाहरूख शेख, बन्या ऊर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले (सर्व रा. इंदिरानगर) या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत उत्तम मोहिते याची पत्नी ज्योती हिने फिर्याद दिली आहे.
उत्तम मोहिते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहे. मंगळवारी त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्या गारपीर चौक परिसरातील घराजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेवणाचे निमंत्रणही काही मित्रमंडळींना देण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारण्यासाठी घरासमोर रस्त्यावर स्टेज उभारले होते. सायंकाळी केक कापण्यात आला. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे व उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसापासून वाद धुमसत होता. वाढदिनी उत्तम आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला.
गणेश हा उत्तमच्या अंगावर धावून गेला. तेव्हा उत्तमचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते याने त्याला समजावले. त्यानंतर गणेश तेथून गेला. रात्री साडे अकराच्या सुमारास गणेश हा साथीदारांना घेऊन उत्तमच्या घराजवळ आला. तेव्हा गर्दी कमी झाली होती. उत्तमला पाहून हातात शस्त्रे घेऊन हल्लेखोर पळत आले. त्यांना पाहून उत्तम तत्काळ घराच्या दिशेने पळाले. घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यास गाठले. दरवाजा ढकलून आत हॉलमध्ये त्याच्यावर हल्ला चढवला. उत्तमच्या पुतण्याने वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उत्तमच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार झाल्यानंतर गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी रॉडसह लाखाबुक्क्यांनीही मारहाण केली. याचवेळी हल्लेखोर उत्तम यांच्यावर हल्ला करत असतानाच एकाचा चाकू हल्लेखोर शाहरूखच्या मांडीत पाठीमागून खोलवर घुसला. त्यामुळे तो लंगडत बाहेर आला. घरासमोर आल्यानंतर तो खाली पडला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उत्तम मोहिते यास त्याचा पुतण्या व इतरांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतू मृत झाल्याचे सांगितले. काही वेळात मांडीत चाकू घुसलेल्या शाहरूखला जखमी अवस्थेत सिव्हीलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मध्यरात्रीनंतर त्याचाही मृत्यू झाला.
हल्लेखोर शाहरुखचा साथीदारांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव
हल्ला करणाऱ्या संशयितांपैकी एकाचा चाकू मांडीत घुसल्याने हल्लेखोर शाहरूख रफीक शेख (वय २६, रा. इंदिरानगर) याचा देखील अतिरक्तस्त्रावाने मध्यरात्रीच्या सुमारासत मृत झाला. मृत शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असून त्यामध्ये मंगळवेढा येथील एका खुनाच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.