Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"पक्ष माझ्या मालकीचा नाही, तुमच्या काकांचा"

"पक्ष माझ्या मालकीचा नाही, तुमच्या काकांचा"

बीड : खरा पंचनामा 

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार आणि एबी फॉर्म माझ्याकडे द्या, अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली होती, असा आरोप अजित पवार यांनी बीडच्या सभेत केला होता. पण ही मागणी पूर्ण होत नाही हे लक्षात येताच योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते. भाजपच्या मंत्री आणि जिल्ह्यातील नेत्या पंकजा मुंडे यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले गेले.

दरम्यान योगेश क्षीरसागर यांना गेवराईच्या पंडित कुटुंबाचा विरोध होता आणि त्यातून बीड नगर परिषदेतील क्षीरसागर घराण्याची मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झाला होता, अशी चर्चा आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची बीडमध्ये काल सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर आणि एकूणच क्षीरसागर कुटुंबावर जोरदार टीका केली. पाच वर्षे सत्ता माझ्या हातात द्या, जी कामे 35-40 वर्षात झाली नाही ती मी तुम्हाला करून दाखवतो असा, शब्द त्यांनी बीडकरांना दिला.

बीडची दुरावस्था, रस्त्यांची परिस्थिती, महिन्याला येणारे पाणी, वाढती गुंडागर्दी अशा सगळ्याच मुद्द्यांना हात घालत अजित पवारांनी क्षीरसागर कुटुंबाच्या मक्तेदारीला आव्हान दिले. योगेश क्षीरसागर यांनी सगळे 'एबी फॉर्म' आपल्याकडे द्यावे, अशी मागणी केल्याचा दावा करत 'तुम्ही का पक्षाचे मालक झाला आहात का'? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

उमेदवारी देताना सगळ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे आम्ही ठरवले, मात्र जेव्हा मला फोन आला की ते सगळे एबी फॉर्म स्वतःकडे मागत आहेत त्यावेळी मी स्पष्टपणे नकार दिला. हा पक्ष काही कोणाच्या एकाच्या मालकीचा नाही. त्यामुळे असं चालणार नाही हे मी ठणकावून सांगितलं.

अजित पवारांच्या या दाव्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, अशी मागणी मी कधीच केली नव्हती. अजितदादांना येथील स्थानिक कार्यकारणीतील टोळक्याने चुकीचे फीडबॅक दिले असेल तर मला याची कल्पना नाही. राहिला प्रश्न पक्ष कोणाच्या मालकीचा? तर तो माझ्या मालकीचा आहे असे मी कधीच म्हणालो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्याच काकाचा आहे, तुम्ही तो नीट सांभाळा, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.