खासदार, आमदारांचा सन्मान राखा, अन्यथा कारवाई
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : खरा पंचनामा
खासदार आणि आमदारांशी सर्व सरकारी, निमसरकारी तसेच महामंडळांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी म्हणून नवीन आदेश काढला आहे. त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन केले नाहीतर त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लोकप्रतिनिधींशी उडणारे खटके, वादावादी काही नवीन नाही. माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि अन्य आमदारांनी अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचे किस्से राज्यात गाजले होते. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आम्हाला सन्मानाची वागणूक देत नाहीत, आमच्यासाठी असलेला शिष्टाचार पाळत नाहीत अशी ओरड सातत्याने आमदारांकडून होत आली आहे.
यावरून प्रत्येक अधिवेशनात हक्कभंगाची प्रकरणे सभागृहात मांडली जातात. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने खासदार, आमदारांच्या शिष्टाचाराबाबत नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशाचे पालन करणे सरकारी, निमसरकारी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सक्तीचे करण्यात आले आहे.
विधानमंडळ सदस्य किंवा संसद सदस्य कार्यालयास भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी, त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे व प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तत्काळ मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ते भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांना त्यांना अभिवादन करावे लागेल. फोनवर बोलताना नेहमी आदरयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.