महायुतीमध्ये नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड अंतर्गत तणाव आणि बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. रविवारी दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांमधील अंतर्गत हेवेदावे किती टोकाला पोहोचले आहेत, याचे प्रत्यंतर आले.
दिल्लीत हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांची बैठकी पार पडते. या बैठकीला अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. परंतु, या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीतील या बैठकीला दांडी मारली आहे. एरवी सर्वपक्षीय बैठकीला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हजर राहतात. मात्र, आज राष्ट्रवादीचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहिलेला नाही. तर दुसरीकडे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे सर्वपक्षीय बैठकीला हजर राहतात. मात्र, आज या बैठकीला श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी नरेश म्हस्के हजर राहिले होते. या सगळ्यामागे महाराष्ट्रात महायुतीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत तणाव कारणीभूत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात येत्या मंगळवारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. यापूर्वी सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढवत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर सध्या तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष रंगला आहे. स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष एकमेकांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावून कुरघोडी करत आहे. तसेच राज्यात कोणाचे वर्चस्व आहे, राज्याच्या तिजोरीवर कोणाचे वर्चस्व आहे, यावरुन तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
राजकीय फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला तणाव शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या काही नगरसेवकांना भाजपने गळाला लावले होते. हा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर शिंदे गटाने मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली होती. यानंतर शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपकडून सुरु असलेल्या फोडाफोडीविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना खासदारांना खडे बोल ऐकवले होते. फोडाफोडीची सुरुवात तुम्ही केली होती, असे फडणवीस म्हणाले होते. यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी न फोडण्याचा राजकीय समझोता केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.