पोलीस ठाण्यातच लाच घेताना प्रभारी अधिकाऱ्यांसाह चार जण एसीबीच्या जाळ्यात
धाराशिव : खरा पंचनामा
धाराशिव जिल्ह्यातून पोलीस विभागाला काळीमा फासणारी घडना समोर आली आहे. लोहारा पोलीस स्टेशनमध्ये पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मित्राविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला सह आरोपी न करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराकडे एवढी रक्कम नसल्याने त्याने स्वतःकडील 10 तोळे वजनाचे सोन्याचे कडे हमी म्हणून दिले. दरम्यान, आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाकडून 3 लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले आणि उर्वरित 2 लाख रुपयांची मागणी केली.
या प्रकरणाची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्रामार्फत करण्यात आली. पडताळणीत पोलीस कर्मचाऱ्यांनी सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवल्याचे आणि लाच रक्कमेबाबत चर्चा केल्याचे उघड झाले.
यानंतर 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायं 6:56 वाजता, तक्रारदाराच्या शेतात (भातागली, ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान अर्जुन शिवाजी तिघाडे, पोलीस नाईक, यांनी तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACB पथकाने त्याला रंगेहात पकडले.
या प्रकरणात आरोपी ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (प्रभारी अधिकारी), आकाश मधुकर भोसले (पोलीस शिपाई), अर्जुन शिवाजी तिघाडे (पोलीस नाईक) आणि निवृत्ती बळीराम बोळके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.