"आता मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसही अजित पवारांना वाचवू शकणार नाही"
मुंबई : खरा पंचनामा
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत", असा थेट इशारा दिला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, "मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यातून वाचवलं. मात्र, यावेळी त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही."
"मी जे घोटाळे बाहेर काढणार आहे, जे पुरावे सादर करणार आहे, ते केल्यानंतर आता अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणाकडेही गेले तरी त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. मी याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशांद्वारे कारवाई होईल याची काळजी घेणार आहे. एकाही खटल्यामधून त्यांना बाहेर येऊ देणार नाही," असा थेट हल्लाबोलच दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.
पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? निपक्ष चौकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा."
"शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. आम्ही तो व्यवहार रद्द करतो, म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्यासारखे आहे. पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा," असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.