नागपूरच्या शासकीय कार्यक्रमात खुर्चीसाठी भांडणाऱ्या शोभा मधाळे निलंबित
नागपूर : खरा पंचनामा
नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, त्यानंतर या घटनेला मोठं वळण मिळालं आहे.
या घटनेत सहभागी झालेल्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून, त्यांच्या वर्तनावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
24 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मोठ्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पोस्ट विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकारी नागपूरच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे आणि प्रभारी पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान दोघींमध्ये मंचावर खुर्चीच्या जागेवरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका वाढला की, दोघी एकमेकींवर शाब्दिक टीका करताना दिसल्या, एवढंच नव्हे तर चिमटे काढणे, शाब्दिक टीका करताना दिसल्या, एवढंच नव्हे तर चिमटे काढणे, धक्का मारणे असे प्रकार सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाले. हे सर्व दृश्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच घडलं, त्यामुळे या प्रकारावर मोठी चर्चा रंगली.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा मधाळे यांची काही महिन्यांपूर्वी धारवाड (कर्नाटक) येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना नागपूर विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. मात्र मधाळे यांनी आपला पदभार सोडण्यास नकार दिला.
बदली आदेशाला मधाळे यांनी न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली होती. त्यामुळे नागपूर विभागात दोघींमध्ये अधिकारांबाबत तणाव निर्माण झाला होता. हा तणावच रोजगार मेळाव्यातील वादात परिवर्तित झाला.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर विभागाने चौकशी सुरू केली असून, प्राथमिक अहवालानंतर पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचं निलंबन कायम राहणार आहे. या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत आणि शिस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विभागातील वरिष्ठ अधिकारीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नव्या आचारसंहितेवर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.