सर्वपक्षीय नेत्यांना आयुर्वेद महाविद्यालयांचे 'वाटप'!
तब्बल २० महाविद्यालय महाराष्ट्रात
मुंबई : खरा पंचनामा
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली (एनसीआयएसएम) यांनी देशभरात नवीन ३१ आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता दिली.
त्यापैकी २० महाविद्यालये महाराष्ट्रातील असून विदर्भातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना हे आयुर्वेद महाविद्यालय मिळाले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रांना देखील गेल्या वर्षी आयुर्वेद महाविद्यालय मंजूर झाले आहे.
'बीएएमएस' या आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांची सविस्तर पडताळणी करून नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रात २० नवीन महाविद्यालय सुरू झाली असून प्रवेश प्रक्रिया देखील प्रारंभ झाली. विदर्भात मान्यता मिळालेल्या आयुर्वेद महाविद्यालयात अकोला व नागपूर जिल्ह्यातील दोन महाविद्यालये, शेगांव, कारंजा लाड व गोंदिया येथील प्रत्येकी एक महाविद्यालय अशा एकूण सात महाविद्यालयांचा समावेश आहे.
राज्यात मान्यता मिळालेल्या आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये बहुतांश महाविद्यालये राजकीय नेत्यांची आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मुक्ताईनगर येथे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लोणी, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे अकलुज, माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे इचलकरंजी, माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या कन्या किर्ती गवई यांचे कारंजा लाड, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड, आमदार किशोर दराडे यांचे येवला, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचे सांगुलवाडी (सिंधुदुर्ग), राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांचे हातनूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांचे बाभुळगांव अकोला येथील आयुर्वेद महाविद्यालयास शासनाने मान्यता दिली.
गतवर्षी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता मिळाली होती. आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली. तज्ज्ञांच्या समितीद्वारे मान्यता देण्यापूर्वी पडताळणी केली. पुढील पाच वर्षाची अनामत रक्कम देखील संबंधित महाविद्यालयांच्या संस्थाचालकांकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.
नवीन आयुर्वेद महाविद्यालयांना ६० किंवा १०० विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर झाली आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देखील सुरू झाले असून चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.