पोलीस ठाण्याच्या आवारात एक लाखांची लाच स्वीकारताना पीएसआय जाळ्यात
नाशिक : खरा पंचनामा
अटकेतील संशयितास लवकरात लवकर जामीन होण्यासाठी तसेच दोषारोपपत्र दाखल करताना प्रकरण सौम्य करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. महत्वाची बाब म्हणजे संशयित अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारात लाचेची रक्कम स्वीकारली. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजू ब्रिजलाल पाटील (४२, एमआयडीसी पोलीस ठाणे, सिन्नर) असे संशयित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली आहे.
या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मुलाला वाढीव पोलीस न मागण्यासाठी आणि संशयिताला लवकरात लवकर जामीन होण्यासाठी तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांनी एक लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली. दोषरोपपत्र दाखल करताना हे प्रकरण सौम्य करण्याची तयारी दर्शविली गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तडजोडीअंती एक लाख रुपये लाचेची रक्कम निश्चित झाली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिकच्या पथकाने सापळा रचला. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील हे एक लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस दलाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.