'पोक्सो'सारख्या गंभीर गुन्ह्यात दिरंगाई करणाऱ्या शहापूरच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा!
आमदार राहुल आवाडे यांनी नागरिकांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन केली मागणी
इचलकरंजी : खरा पंचनामा
'पोक्सो'सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात उघड उघड दिरंगाई करून कर्तव्यच्युती करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करा, अशी धडाकेबाज मागणी आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी थेट पोलीस ठाण्यात घुसून केली. प्रकरण दोन दिवसांत निकाली न काढल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच सामाजिक संघटनांसह ठिय्या आंदोलन करण्याचा स्पष्ट इशाराही आमदार आवाडेंनी यावेळी दिला.
अल्पवयीन मुलीवर कुटुंबातील परिचित व्यक्ती बाबासाहेब बाणदार (58, रा. तोरणानगर) याने घरात बोलावून अश्लील, लज्जास्पद कृत्य केल्याप्रकरणी पोक्सोचा (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) गुन्हा दाखल आहे. किराणा दुकानात खाऊ घ्यायला गेलेल्या मुलीला घरात ओढून नेऊन तिच्याशी लैंगिक चाळे केल्याचे समोर आले आहे. मुलीकडून धक्कादायक माहिती समजताच पीडितेच्या आईने फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस ठाणे गाठले.
परंतु येथेच पोलिसांच्या निष्काळजीपणाचा कळस झाला. फिर्याद घेण्याऐवजी पीडितेच्या आईला रात्री उशिरापर्यंत ठाण्यात बसवून ठेवण्यात आले, अशी संतापजनक माहिती समोर आल्यानंतर नागरिक व सामाजिक संघटनांमध्ये संताप उसळला. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी सकाळी शहापूर ठाण्यात प्रवेश करताच निरीक्षक सूर्यवंशी यांना जाहीरपणे झापले. त्या वेळी डीवायएसपी विक्रांत गायकवाड देखील उपस्थित होते. ठाण्यात जमा झालेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या ढिसाळ, पक्षपाती कामकाजाबाबत तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला.
गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा आणि पोलिसी दायित्वाचे सरळ उल्लंघन केल्यामुळे निरीक्षक सूर्यवंशी यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी ठाम मागणी आमदार आवाडेंनी गायकवाड यांच्यासमोर केली. यावर वरिष्ठांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याची ग्वाही डीवायएसपींनी दिली.
दरम्यान, दोन दिवसात निलंबन न केल्यास पीडित मुलगी, तिचे कुटुंब, सर्व सामाजिक संघटना व स्वतः आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ठाण्याच्या मुख्य दरवाज्यावर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देत आवाडेंनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.